Friday , April 4 2025
Breaking News

कोरे गल्ली शहापूर पंच व युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आचरण

Spread the love

 

बेळगाव : वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा दिन कोरे गल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील तर व्यासपीठावर नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवसेनेचे राजकुमार बोकडे, ज्येष्ठ पंच शिवाजी हावळणाचे व शिक्षिका सौ.सुमित्रा मोडक होत्या.

प्रास्ताविक रणजित हावळणाचे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

धनंजय पाटील यांनी मराठी भाषा व संवर्धन यावर मार्गदर्शन करताना धर्म प्रथम की भाषा यावर बराच उहापोह होतो पण मुळात भाषा हीच धर्माची व्याख्या आणि ओळख करून देते त्यामुळे भाषा ही अग्रगण्य मानली पाहिजे. आपली मातृभाषाच धर्माला समृद्ध बनवते, आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही पालक, शिक्षकांबरोबरच समाजाचीही आहे. प्रत्येकाने आपल्या पाल्याला पाचवी पर्यंतचे शिक्षण मराठीतून म्हणजेच आपल्या मातृभाषेतून दिले पाहिजे, जेणेकरून त्याचा मेंदू प्रगल्भ होईल व समाजात वावरताना कोणताही न्यूनगंड राहणार नाही. बेळगाव परिसरात बोली भाषा म्हणून ग्रामीण भाषा जास्त बोलली जाते त्या ग्रामीण भाषेला अधिक समृद्ध केले पाहिजे, जेणेकरून आपल्या भाषा व संस्कृतीचे जतन होईल. ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक जीवनात यशस्वी झेप घेतलेली आहे, त्यांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलेले आहे म्हणून आपणही आपली मराठी भाषा शिकतांना किंवा बोलताना कोणताही न्यूनगंड न बाळगता ती आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्याच बरोबर मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच शिक्षण दिले पाहिजे, त्यांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जास्त ओढला गेलेला दिसत असून ही मराठीसाठी व त्यांच्यासारख्या असंख्य लोकांच्या नोकरीसाठी धोक्याची घंटा आहे, तरी शिक्षकांनी वेळीच सावध व्हावे व माजी विद्यार्थी संघटनांनींनी आपल्या शाळेत एक दिवसासाठी कार्यक्रम न करता शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन धनंजय पाटील यांनी केले.

कोरे गल्ली पंच कमिटी व महाराष्ट्र एकीकरण समिती, रामलिंगवाडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अयोजकांतर्फे कोरे गल्ली येथील अंगणवाडी ते सातवी पर्यंतचे शिक्षण मराठीतुन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आभार सुधीर नेसरीकर यांनी मानले, या कार्यक्रमाला कोरे गल्ली पंच शांताराम मजुकर, शिवाजी मजुकर, गजानन शहापूरकर, राजाराम मजुकर, मोहन पाटील, अभिजीत मजुकर, राजू गावडोजी, किरण पाटील, परशराम शिंदोळकर, आनंद पाटील, रवी जाधव, गोकुळ पाटील, राजेश सावंत, साईनंद चिगरे, दीपक गोंडवाडकर, विजय ढम, युवा समिती सीमाभागचे मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, विजय जाधव, राजू पाटील, इंद्रजीत धामणेकर, सुरज जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर रोड के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी टाकलेला कचरा पेटवल्याने दुर्गंधीयुक्त धूर

Spread the love  बेळगाव : रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे आणि कचरा जाळण्याचे प्रकार बेळगाव शहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *