Sunday , September 8 2024
Breaking News

एनयुजेएम बेळगाव शाखेच्यावतीने मराठी भाषा दिन साजरा

Spread the love

बेळगाव : बेळगावमधील नामवंत कवियित्रींनी विविधांगी स्वरचित कविता सादर करून मराठी भाषा दिनी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. कुसुमाग्रज तथा विनायक वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारांच्या सन्मानासाठी व सक्षम पत्रकारितेसाठी कार्य करणाऱ्या नॅशनल युनियन जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) बेळगाव शाखेच्यावतीने मराठी भाषा दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित पत्रकार साहित्यिक आणि कवियित्रीं आदि मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

केवळ भारत देशातीलच नव्हे तर परदेशात स्थायिक झालेला मराठी भाषिक हा, मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी विविध माध्यमाद्वारे आणि विविध स्तरावर आपापल्यापरीने प्रयत्नशील आहे, असे स्मार्ट न्यूज चे संपादक उपेंद्र बाजीगर यावेळी बोलताना म्हणाले. मराठी माणसाच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच मराठी भाषेच्या अस्तित्वाला आणि अस्मितेला कदापि धक्का लागणार नाही, असा विश्वासही बाजीकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात बेळगावमधील नामवंत कवियित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून कवी कुसुमाग्रज यांना अनोख्या पद्धतीने जन्मदिनी अभिवादन केले. कवियित्री अस्मिता आळतेकर यांनी आपली, “सांजवेळ” ही कविता सादर करताना
” कातरवेळी मावळतीला
लाल केसरी रंग पसरला
नभांगणी तो खेळ रंगला
रविराज अस्तास चालला ”
अशा काव्यओळी सादर करून सायंकाळच्या सूर्यास्ताचा आल्हाददायक क्षण श्रोत्यांसमोर उभा केला.
कवियित्री शीतल पाटील यांनी, “मराठी थाळी” ही कविता सादर करताना,
“प्रत्येक प्रदेशाचे वेगळेपण जपते ही मराठी
वेगवेगळ्या प्रदेशांचा स्वाद जपणारी मराठी”
असे सांगत भारत देशातील विविध प्रदेशातील खाद्यपदार्थांची महत्ती सांगताना विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले. “परिसस्पर्श” ही कविता सादर करताना कवियित्री सौ. स्मिता किल्लेकर यांनी,
“सृष्टी बहरली लेऊन प्रसन्नतेचे हिरवे लेणे
गाई गीत कोकिळा कुहू कुहूचे मंजुळ गाणे”
असे शब्दगुंफत जणू आल्हाददायक निसर्गाचा गोडवा श्रोत्यांसमोर मांडला.
प्रा. मनीषा नाडगौडा यांनी,
“ज्ञानाचा सागर भाषा तुमची आमची
भाषेचा गोडवा अन जोड़ नितिमत्तेची
शिवबांची ज्ञानोबांची तुकोबांची मराठी आमची
लेवूनि शब्दांची गुणवत्ता श्रेष्ठ मराठी आमची”,
असे बोल सादर करीत मराठी भाषादिनी मराठीचा गोडवा आणि मराठीची महत्ती उपस्थित श्रोत्यांसमोर मांडली.
कवियित्रीं विजया उदय उरणकर यांनी,
“झाशीची रणरागिणी लक्ष्मीबाई” अशा शब्दात झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगणेचे देशप्रेम आणि शौर्य आपल्या काव्यमय शब्दातून मांडले.
आपल्या मुलींची नावेच ओवी आणि दोहा असे ठेवून तन्मयतेने काव्याशी एकरूप झालेल्या कवियित्री धनश्री फत्तेसिंग मुचंडी यांनी,
“लाख ओवी लाख दोहा मी आता रचणार आहे
तोडूनी संसार पाश, श्लोकांमध्ये रमणार आहे”
हि स्वरचित कविता सादर करून कविताच हेच आपले विश्व असल्याचे सांगत उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या.

काव्य सादरीकरणाच्या कार्यक्रमानंतर मराठी भाषेचे संवर्धन आणि संगोपन या संदर्भात पत्रकार साहित्यिक आणि कवियित्रीं यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मराठी भाषेचे वैभव आणि मराठी भाषेची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. तसेच मराठी माणसाने व्यवहार अथवा इतरत्र मराठी भाषेच्या वापराबद्दल नेहमीच आग्रही असावे, व्यवहारात नेहमी मराठीचा वसा जपावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक मराठी माणसाच्या घरातूनच व्हावा असे विचार यावेळी उपस्थित पत्रकार साहित्यिक आणि कवियित्रींनी मांडले.
एनयुजेएम, बेळगाव शाखेचे मुख्य संयोजक श्रीकांत काकतीकर यांनी स्वागत केले. माय मराठी साहित्य संघ सांबराचे संस्थापक सदस्य दिलीप चव्हाण, पत्रकार मिलिंद देसाई, प्राइड न्यूजचे संपादक अमृत बिर्जे आणि उपस्थित कवयित्रींनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पत्रकार उपेंद्र बाजीकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. तर बीएन 7 न्यूजचे संपादक रवींद्र जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम संयोजिका आणि संदेश न्यूजच्या संपादिका अरुण गोजे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *