बेळगाव : मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला, रविवारी सायंकाळी उत्साहाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून जी. एस. एस. कॉलेजचे प्राध्यापक श्री. भरत ताेपिनकट्टी सर व प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराचे पॅरा कमांडो श्री. लक्ष्मण खांडेकर व शशी आंबेवाडीकर व अमेरिका येथे वास्तव्याला असणारे वाचनालयाला भरघोस आर्थिक मदत करणारे श्री. नागराज भरमाणी पाटील व वाचनालयाचे संस्थापक श्री. अनंत लाड सर उपस्थित हाेते.
प्रारंभी कविवर्य, लेखक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर मेघा धामणेकर या विद्यार्थीनीने महाराष्ट्र गाैरवगीत सादर केले.
पाहुण्यांचा परिचय संतोष जैनाेजी व वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड सर यांनी करुन दिला. स्वागत बजरंग धामणेकर यांनी केले. उत्कृष्ट वाचक म्हणुन संतोष जैनाेजी व ज्येष्ठ नागरिक कृष्णा अनगाेळकर यांचा व वाचनालयाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणारे मारुती बेळगावकर, संदीप वागाेजी, पुंडलिक कणबर्गी, व त्यांच्या सहकार्यांचा गाैरव करण्यात आला.
अनंत लाड यांनी बोलताना ‘जगामध्ये 20000 भाषा असून जगातील 100 हून अधिक देशांत मराठी भाषा बोलली जाते. जगात मराठीचा दहावा क्रमांक असून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणाऱ्या सर्व कसोट्या मराठी भाषा पार करते. त्यामुळे मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळणेची गरज आहे विचार मांडले.
श्री. भरत ताेपिनकट्टी सरानी मराठी साहित्य व भाषेबद्दल माैलीक विचार मांडले. भारतामध्ये मराठी भाषेचा तिसरा क्रमांक असून आपली भाषा टिकविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी ग्राम पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करून नवीन पिढीला मराठी भाषेकडे आकर्षित करण्याची गरज आहे. ज्याना मराठी शाळेत जाऊन शिकता येणे शक्य नाही त्यांनी आपल्या घरी मराठीचा सराव केला तरीही बरीच प्रगती करता येईल, असे सांगून ताेपिनकट्टी सरांनी अनेक उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कुंडेकर यांनी केले व वाचनालयाचे अध्यक्ष विनायक चाैगुले यांनी आभार मांडले.
या कार्यक्रमाला गजानन छपरे, वासु लाड, सागर जैनाेजी, प्रशांत नांदाेडकर, अथर्व गावडा, संभाजी कणबरकर, विनायक पाटील, संजय कांबळे, बहुसंख्य वाचक व महिला वर्ग, विदयार्थी व विद्यार्थीनी उपस्थित हाेते.
Belgaum Varta Belgaum Varta