बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक भयानक हत्या प्रकरण घडले आहे. खुद्द बापानेच आपल्या मोठ्या मुलाच्या मदतीने धाकट्या मुलाचा खून केला आहे. कौटुंबिक भांडणाचे रूपांतर हिंसक होऊन त्याचे पर्यावसान खुनात झाले. कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदीहल्ली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस तपास करत आहेत. २५ वर्षीय मंजुनाथ उळागड्डी असे मयताचे नाव आहे. मंजुनाथ दारू पिऊन नेहमीच त्याच्या पालकांशी भांडत असे. शनिवारी रात्री, जेव्हा तो दारू पिऊन त्याच्या पालकांशी भांडू लागला, तेव्हा त्याचे वडील नागप्पा आणि मोठा भाऊ गुरुबसप्पा वाद घालू लागले. यावेळी मंजुनाथने त्याच्या पालकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती देताना बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, तिथे असलेले गुरुबसप्पा आणि वडील नागप्पा यांनी मंजुनाथवर हल्ला केला आणि अखेर त्याचा जागीच मृत्यू झाला.
मंजुनाथचे लग्न अलीकडेच ठरले होते. त्याचा मोठा भाऊ गुरुबसप्पा भारतीय सैन्यात सेवा करत होता. तो त्याच्या लग्नाची व्यवस्था करण्यासाठी आला होता. पण जेव्हा मद्याचे व्यसन असलेल्या मंजुनाथने दारू पिऊन दंगा करायला सुरुवात केली तेव्हा भांडण हिंसक झाले. आणि त्याचे पर्यावसान खुनात झाले.
Belgaum Varta Belgaum Varta