
येळ्ळूर : सुळगे येळ्ळूर येथील विश्व भारत सेवा समिती संचलित, भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, कणकुंबी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, नामदेव कानशिडे, के एन पाटील, वैजू गुरव, संगीता नाईक, अरुणा पावशे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून आंगडी तांत्रिक कॉलेजचे प्रा. सागर बिर्जे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने साकारण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान कक्षाचे उद्घाटन विजयराव नंदीहळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. तर संगणक कक्षाचे उद्घाटन अरुणा पावशे यांनी केले. प्रमुख वक्ते सागर बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अनेक प्रमुख मान्यवर पाहुण्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची निरोप देणारी व निरोप घेणारी भाषणे झाली. मागील वर्षी विद्यालयात प्रथम आलेली कु. ऋतिका नावगेकर हिचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी व आदर्श खेळाडू यांचाही यावेळी फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला. एस. बी. हन्नूरकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक डी. ए. खोरागडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजयराव नंदीहळ्ळी, सागर बिर्जे व अरुणा पावशे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यु. एस. हट्टीकर, अनिल कुकडोळकर, पूजा मासेकर, मंगल मजुकर उपस्थित होत्या. शिक्षक ए.वाय. मजुकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शिक्षिका सी. डी. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta