कित्तूर : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना कित्तूर येथील अंबडगट्टी गावात घडली असून प्रेमीयुगुलाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, महाबळेश कामोजी आणि सिमरन या प्रेमीयुगुलांचे मागील ५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्याही कुटुंबाला त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती नव्हती. सिमरन – महाबळेश यांच्या शारीरिक संबंधातून सिमरन गर्भवती राहिली. ५ मार्च रोजी सिमरनला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला. तिने ही बाब तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉलद्वारे सांगितली. दोघांनी नवजात बाळाला त्यांच्या घराजवळील नाल्यात फेकून देण्याची योजना आखली होती. नाल्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
परिसरातील आणि जवळच्या रुग्णालयांमधून पुरावे गोळा करणाऱ्या पोलिसांना संशय आला आणि त्यांनी सिमरनची चौकशी केली आणि गुन्ह्याची सविस्तर माहिती उघड झाली. पोलिसांनी सिमरन माणिकबाई आणि महाबळेश कामोजी यांना अटक केली आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.