शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : हरवत चाललेला आपलेपणा, नात्यातली संपत चाललेली ओल वगैरे हक्काच्या आकाशात अन अवकाशात जपता आलं पाहिजे असं सांगणाऱ्या भावगर्भ कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने सोमवार दि. २४ मार्च रोजी जागतिक कविता दिनानिमित्त कवयित्री उर्मिला शहा यांच्या कविता समजून घेणारा ‘माझं घायाळ आभाळ’ हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी डॉ. चंद्रकांत पोतदार होते. प्रारंभी शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. माझ्या जडणघडणीत शब्दगंध कवी मंडळाचे प्रोत्साहन मिळाले असून सकाळ सप्तरंग मध्ये पहिली कविता प्रकाशित झाली आणि त्यानंतर माझी कविता प्रगल्भ होत गेली असे मत उर्मिला शहा यांनी मांडले.
या कार्यक्रमात उर्मिला शहा यांनी अनेक उत्तमोत्तम कवितांचे वाचन केले. ‘मी चौकटीच्या आत’ कवितेतून स्त्रीला अजूनही बंधने पूर्णपणे तोडता आले नाहीत याची खंत व्यक्त केली.
“निगराणी शिवाय एकट्यानं
कसं फुलावं हे सदाफुलीनं शिकवलं
तेव्हापासून एकटेपण
तिच्यासारखं फुलत राहिलं”
अशा ओळीतून आयुष्यातील एकटेपणाची सल त्यांनी वेगवेगळ्या प्रतिमा वापरून व्यक्त केल्या. ‘दोन पिढीतले अंतर’ कवितेत वाढत गेलेल्या दोन पिढीतले अंतर आणि त्यातून निर्माण झालेल्या ताणतनावाविषयी भाष्य केले. त्याच सोबत ‘आई’, ‘माणूस एक पुस्तक’, ‘ओंजळीतलं उदक’, ‘अहेव लेणं’, ‘जपून टाक पाऊल पुढे’ यासारख्या उत्कृष्ट कवितां रसिकांना भावुक करून गेल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले डॉ चंद्रकांत पोतदार यांनी कवितेत कवी कोणत्या भूमिका मांडतो? याला महत्त्व असून उर्मिला शहा यांनी कवितेत मांडलेल्या प्रतिभा, प्रतिमा अतिशय वास्तववादी असल्याचे मत व्यक्त केले.
यानंतर शब्दगंधच्या सदस्यांचे काव्य वाचन झाले. यामध्ये व्ही एस वाळवेकर, गुरुनाथ किरमटे, डॉ. प्रेमा मेनशी, प्रा. संजय बंड, महेश पाटील, शिवाजी शिंदे, नंदिनी दामले, बसवंत शहापुरकर, परशराम खेमने, अस्मिता अळतेकर, सुधाकर गावडे शीतल पाटील, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई आदींनी कविता सादरीकरण केले.
कार्यक्रमाला प्रा सुभाष सुंठणकर, सागर मरगाणाचे, प्रा. निलेश शिंदे, गजाननमादार यांच्यासह रसिक उपस्थित होते. आभार सचिव सुधाकर गावडे यांनी मानले.