
मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : शहापूर बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिर येथे शहापूर परिसरातील विविध गल्ल्यातील पंचमंडळी महिला युवक ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे.
जिर्णोद्वारासंदर्भात झालेल्या निर्णयाची माहिती देताना माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शहापूर येथील नागरिक 1996 पासून करीत आहेत. मात्र मंदिरावर मालकी हक्क सांगत येथील पुजारी न्यायालयात गेल्यामुळे अनेक वर्षे मंदिर जिर्णोध्दार काम रखडले होते. गेल्या तीन-चार वर्षात पावसामुळे तसेच जीर्ण झालेल्या मंदिराच्या भिंती धोकादायक स्थितीत आहेत. भिंती कोसळण्याचा संभाव धोका लक्षात घेऊन येथील स्थानिक नागरिकांनी अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंदिर बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यावेळी मंदिरा संदर्भातील माहिती देण्यात आली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांबद्दल आमची तक्रार नाही. त्यांनी त्यांचे पौराहीत काम सुरू ठेवावे. न्यायालयाचा निकाल जसा लागायचा तसा लागेल. मात्र जिर्णोद्धार करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी विनंती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून अहवाल मागितला होता. त्या अहवालात मंदिराच्या धोकादायक स्थितीची पुष्टी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिरावर बेळगावच्या सर्कलची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. आता मंदिराच्या जिर्णोध्दाराचे जे काही बांधकाम होईल ते प्रशासकांच्या देखरेख खाली होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला रमाकांत कोंडुस्कर, निखिल मासेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, शंकर बाबली, माजी नगरसेवक राजू बिरजे, अमृत भाकोजी, राजू उंडाळे यांच्यासह बहुसंख्य स्थानिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta