बेळगाव : शहरातील वनिता विद्यालय शाळेतील शैक्षणिक वर्षात भरमसाठ फी वाढ झाल्याबद्दल पालकांनी शाळेच्या गेट समोर निदर्शने केली होती. याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका जोसेफिन-गुंती यांना भेटून फी वाढ तात्काळ मागे घेण्याबद्दल निवेदन दिले. यावेळी बोलताना प्रसाद चौगुले म्हणाले की, वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. एकाच कुटुंबातील दोन ते तीन मुले या शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे पालकांना ही वाढीव फी भरणे त्रासदायक होणार आहे. शाळा व्यवस्थापन तसेच कर्मचारी व पालकांच्या सहकार्यामुळे शाळा सुरळीत चालली आहे. यापुढे देखील अशीच सुरळीत चालू राहून ज्ञानदानाचे काम या शाळेच्या माध्यमातून होऊ दे असे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षातील शैक्षणिक फी वाढीबद्दलचा निर्णय मागे घेण्याची विनंती प्रसाद चौगुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे आणि वाढीव फी संदर्भात शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावा जेणेकरून पालकांना शैक्षणिक वर्षाची फी भरणे सोपे होईल व आपल्या पाल्यांना शिक्षण देता येईल अशा आशयाचे निवेदन प्रसाद चौगुले यांनी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना दिले आहे.