
बेळगाव : शहापूर येथील चर्मकार समाजाच्या दीडशे वर्षाहून अधिक पुरातन असलेल्या श्री सोन्या मारुती देवस्थानाचा जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या भक्तीभावात पार पडला. श्री मनोरंजन प्रणव स्वरुपी निजलिंग स्वामींजी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
जीर्णोद्वार आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला श्री मनोरंजन प्रणव स्वरुपी निजलिंग स्वामींजी यांच्यासह महापौर मंगेश पवार, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी, डॉक्टर गणपत पाटील, नगरसेवक नितीन जाधव, रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, चर्मकार समाजाचे नेते रवी शिंदे, हिरालाल चव्हाण यांच्यासह समाजातील अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना स्वामीजी म्हणाले, समाज ज्यावेळी एकत्र येऊन कुटुंब प्रमाणे कार्य करतो, ते कार्य निश्चितच यशस्वी होते. आपण विविध जाती धर्मात विखुरलो गेलो आहोत. अशातून मतभेद आणि संघर्ष पाहायला मिळतात. त्यामुळे मतभेद भेदभाव सोडून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. एकीच्या शक्तीमुळे सर्वकाही साध्य करता येते. समाजाच्या कार्यात युवाशक्ती, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. युवा पिढीने माता पिता, गुरु आणि समाजाचे ऋण कधीही विसरू नये. राम सेतू बांधताना ज्याप्रमाणे खारीने सेवा बजावली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सामाजिक कार्य करावे. सेवाभावी कार्यातून मिळणारे समाधान मोठे अलौकिक असते. प्रत्येकाने हिंसेचा मार्ग सोडून शांती समाधानाने जीवन जगावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, सचिव सदानंद कदम, सदानंद पवार, परशुराम चव्हाण, सचिन पवार, डॉ. बाळकृष्ण पवार, दयानंद कदम, प्रवीण पवार, सुनील माणगावकर, परशराम चौगुले, दत्तात्रय शिंदे, अभिमन्यू जाधव, किशोर पवार, यांच्यासह युवक आणि महिला मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीर्णोद्वार आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta