
बेळगाव : पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही, सिद्धरामय्या सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपने बेळगावात तीव्र आंदोलन छेडले.
आज बेळगावात भाजपच्या वतीने भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. झिरो टॉलरन्सचा नारा देत, पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील राणी चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला.

माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पण सत्तेतील सिद्दरामय्या सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही गोष्ट कोणत्याही पक्षापुरती मर्यादित नाही. संपूर्ण देशासाठी ही बाब चिंतेची आहे. देशाला धोका निर्माण झाला तर संपूर्ण जनता एकत्र येते, ही आपल्या देशाची परंपरा आहे. मात्र सिद्दरामय्या हे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. राज्य सरकारने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी म्हटले की, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने कठोर निर्णय घेत सर्व राज्यांना आपल्या भागातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्नाटक सरकार यामध्ये अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकत आहे. देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देशाबाहेर हाकलण्यात यावे, अशी त्यांची जोरदार मागणी होती.
भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक हणमंत कोंगाळी, नगरसेवक राजशेखर ढोणी, श्रेयस नाकाडी, मुरुघेंद्रगौड पाटील, शिल्पा केकरे, महेश मोहिते, महांतेश चिन्नप्पगौडर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta