
बेळगाव : पहेलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ गुप्त तळांवर अचूक हल्ले करून क्रौर्य गाजवणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर बेळगाव भाजपच्या वतीने राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भाजपच्या महापालिका प्रमुख गीता सुतार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करताना सांगितले की, दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी भारताने वेळोवेळी कडक पावले उचलली आहेत. ऑपरेशन सिंदुरमुळे पहेलगामच्या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
भाजप महिला आघाडीच्या शिल्पा केकरे बोलताना म्हणाल्या, भारतीय महिलांच्या कुंकुवार घाला घालणाऱ्यांना आता शौर्याची ताकद महिला सैनिक दाखवून देत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल व्योमीका सिंग यांच्या नेतृत्त्वात भारताने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे, असे त्या म्हणाल्या. माजी खासदार मंगला अंगडी यांनीही लष्कराच्या कार्याची प्रशंसा करून पंतप्रधान मोदी यांचे आणि जवानांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक हणमंत कोंगाळी, राजशेखर ढोणी, जयतीर्थ सोंदत्ती, पदाधिकारी उज्वला बडवण्णाचें, विजय कोडगनूर, रवीकुमार पावळे, लीना टोप्पण्णावर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta