हावेरी : थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ आज गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
राणेबेन्नूर येथील सिद्धेश्वर नगर आणि हरिहरसह गोव्यात राहणारे फरान (27), उम्मिशिपा (16), अलिशा (20), फुलखान (17) आणि फिरोज (42) यासह अन्य एकजण या अपघातात मरण पावला आहे. तस्लिन आणि महक असे दोघेजण अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर हावेरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्वजण कुटुंबीयांसह सुट्टीनिमित्त आड्डी गार्डन पार्कला जात होते. तिथून पुढे गोव्यात जाण्याचा त्यांचा बेत होता. याआधी त्यांनी राणेबेन्नूर येथील फिरोज यांच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावली. तेथून हे सर्वजण सहलीसाठी रवाना झाले होते. मात्र, ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर थांबलेल्या ट्रकचा कार चालकाला अंदाज आला नाही. भरधाव कार ट्रकला आदळली आणि अनर्थ घडला.
घटनेनंतर ब्याडगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह हावेरी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत.