बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलण्याची केली मागणी
बेळगाव : बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
नियोजित नव्या रेल्वे मार्गाकरिता राज्य सरकारने अर्थसंकल्पात 925 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नव्या मार्गामुळे सुपीक जमिनीवर वरवंटा फिरविला जाणार आहे. याचा सारासार विचार करून गर्लगुंजी, देसुर, राजहंसगड, नंदीहळी, नागेनहळी, के. के. कोप्प आणि हलगीमरडी गावांच्या सुपीक जमिनीवरून जाणारा बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलून तो अन्य मार्गे न्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
हा नवा रेल्वे मार्ग दिवंगत सुरेश अंगडी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे वक्तव्य खासदार मंगला अंगडी यांनी केले आहे, ते वक्तव्य निषेधात्मक असल्याचे शेतकरी नेते प्रकाश नाईक यावेळी बोलताना म्हणाले. हा प्रकल्प शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आणि पिकावू जमीन गिळंकृत करणारा आहे, असेही प्रकाश नाईक यावेळी म्हणाले.
चुनप्पा पुजारी या शेतकरी नेत्याने, या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले.
“या योजनेवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तरीही मी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी बोलेन आणि तुमच्या तक्रारी सांगेन”, असे शेतकर्यांना उत्तर देताना, खासदार मंगला अंगडी यांनी आश्वासन दिले.

Belgaum Varta Belgaum Varta