Tuesday , December 9 2025
Breaking News

निवडणुकीनंतर राजकारण नाही, फक्त विकास : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बेळगाव : राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. निवडणुकीनंतर राजकारण नसते, केवळ विकास असतो, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. बेळगुंदी येथे भव्य श्री रवळनाथ मंदिराच्या वास्तुशांत समारंभा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्यात सहभागी होऊन, कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

मी फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण करते, त्यानंतर रस्ते, गटारे, शाळा, पाणी यासह पक्षातीतपणे मतदारसंघाच्या विकासाला माझे प्राधान्य आहे. संपूर्ण मतदारसंघात कशा प्रकारे विकासकामे सुरू आहेत, हे आपण पाहत आहात. १४० मंदिरांचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सुमारे २५ लाख रुपये खर्चून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मतदारसंघाला आदर्शवत विकासाकडे नेले जात आहे, असे मंत्री महोदयांनी सांगितले.

या भागात शासनाकडून उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षण संस्था सुरू करण्याचे माझे स्वप्न आहे आणि त्यादृष्टीने मी प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानात जन्म घेतल्याचा आणि ग्रामीण भागातील एक मुलगी म्हणून ओळखले जात असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला आहे. सर्वांना समृद्धी आणि शांती लाभो, अशी मी देवाला प्रार्थना करते, असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, शिवाजी बोकडे, युवराज कदम, दयानंद गावडा, अशोक गावडा, ज्योतिबा पगरे, शिवाजी बेटगेरीकर, यल्लाप्पा ढेकोळकर, प्रल्हाद चिरमुरकर, रेहमान तहसीलदार, रामचंद्र पाटील, आनंद जाधव, एस.एम. बेळवटकर, महेश पाटील, गुरुनाथ पाटील, रघू खांडेकर, आप्पाजी शिंदे, रामदेव मोरे, प्रताप सुतार, सुरेश कीणेकर, सोमनगौडा आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *