
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा आणि मुस्लिम बांधव सख्ख्या भावांप्रमाणे एकत्र होते. आजच्या काळात आपण सत्यता विसरत चाललो आहोत. समाजाला खरा इतिहास सांगणारी पुस्तके लिहिली गेली पाहिजेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहरातील कन्नड भवनात रविवारी डॉ. सरजू काटकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी दी ग्रेट मराठा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ ‘ग्रेट मराठा’ म्हणण्यापेक्षा ‘ग्रेट इंडियन’ म्हणायला हवे. ते एक महान समाजसेवक होते. त्यांनी देशात आपले साम्राज्य मजबूत केले आणि त्यांच्या मनात देशप्रेम होते. ब्रिटिशांशी त्यांनी थेट झुंज दिली. अफझल खानाच्या क्रूर राजवटीला कंटाळलेल्या मुस्लिम समुदायातील काही लोकांनी अफझल खानाला संपवण्यासाठी शिवाजी महाराजांशी हातमिळवणी केली होती, असे त्यांनी सांगितले. देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे. डॉ. सरजू काटकर यांनी या पुस्तकात शिवाजी महाराजांचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य दृष्टिकोनातून वाचल्यास देशाचा इतिहास कळेल. शिवाजी महाराज केवळ मराठ्यांपुरते मर्यादित नव्हते. बसवेश्वर आणि त्यांचे अनुयायी लिंगायतांपुरते मर्यादित नव्हते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांपुरते मर्यादित नव्हते. देशातील जनतेने सत्य जाणून घेतले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांशी, डच आणि पोर्तुगीजांशी लढा दिला. त्यांनी जगाला इतिहास दाखवला. ज्योतिबा फुले यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदूंपेक्षा मुस्लिम अधिक होते. शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी मुस्लिम समुदाय उभा होता. मुघलांपासून देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला,असे सतीश जारकीहोळी म्हणाले. ते दूरदृष्टी असलेले नेते होते. शुद्र असल्यामुळे त्यांचा राज्याभिषेक रोखण्यात आला. त्यांचे नाव मोठे होईल म्हणून त्यांची समाधी लपवण्यात आली. आज त्यांचे समर्थक असलेले लोकच पूर्वी त्यांचे विरोधक होते. खरा इतिहास समजल्याशिवाय गोंधळ आणि भांडणे थांबणार नाहीत. मोबाईल आल्यापासून चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी अधिक घडत आहेत, शिवाजी महाराजांना केवळ मराठा न मानता आपले रक्षक म्हणून पाहिले पाहिजे. ते संपूर्ण देशाची संपत्ती आहेत. ते एक ‘ग्रेट इंडियन’ होते, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
यावेळी लेखक डॉ. सरजू काटकर यांनी पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. रामकृष्णा मराठे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉ. मनू बाळीगार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. डॉ. गुरुदेवी हुलेप्पणवरमठ आणि वाय. आर. पाटील यांनी पुस्तकाची ओळख करून दिली. बसवराज कुप्पसगौडर यांनी सूत्रसंचालन केले आणि सुमा काटकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta