
बेळगाव : दि. 24 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती सदस्यांची 1 जून हुतात्मा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. बैठक सुरु होण्याआधी चर्चा रंगली ती मुहूर्तावर लग्न होत नसलेल्या विषयाची. दरम्यान उपस्थित सदस्यांनी समितीच्या बैठकीत चर्चा करून लग्न मुहूर्तावर लागले तरच थांबा अन्यथा लग्नावर बहिष्कार घालावे असे आवाहन करण्यात आले.
मराठा समाजात वेळेवर लग्न लागत नसल्यामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांची चांगलीच पंचायत होत आहे. लग्न समारंभासाठी तासंतास थांबावे लागत आहे. लग्न समारंभात अनेक नवीन प्रथा सुरू असल्याने लग्नाचे धार्मिक महत्त्व कमी होत चालले आहे. मुहूर्ता पेक्षा 15 मिनिटे अधिक वाट पाहावी अन्यथा पाहुणेमंडळी मित्रपरिवार यांनी जेवण न करता लग्नावर बहिष्कार घालावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत मराठा समाजाला करण्यात आले आहे.
सध्या लग्न समारंभाचा मोहोल असल्यामुळे दररोज लग्न होत आहेत. परंतु एकही लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे दिसून येत आहे. काहीजण सकाळी लग्न लावत असल्यामुळे दुपारी किती वेळ झाला तरी वराचे मित्र मंडळीकडून वरातीमध्ये नाचण्यावरच भर दिला जात आहे.
हे प्रताप प्रामुख्याने केवळ मराठा समाजामध्येच रुढ होत चालले आहेत. काही ठिकाणी तर वेळेत लग्न न लागल्यामुळे पाहुण्यांनी जेवण करून निघून जाणे पसंत केले. अशा नवीन कुप्रथा आता सुरू होऊ नयेत व लग्नाच्या नावाने सुरू असलेला धांगडधिंगाणा वेळेस बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने मुहूर्ता नंतर पंधरा मिनिटे वाट पाहून तिथून निघून जावे. यामुळे किमान कुटुंबीयांना आपण वेळेत लग्न लावले नाही याची जाणीव होईल, अशी सूचना मध्यवर्ती समितीने केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta