
बेळगावात भाजपच्यावतीने आंदोलन
बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला पुर्णतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगाव भाजपने तीव्र आंदोलन केले.
आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे फोटो हातात घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या निदर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख उज्ज्वला बडवन्नाचे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, आय.पी.एल. विजयोत्सवासाठी मुख्यमंत्री स्वतः ट्वीट करून लोकांना आमंत्रित करत होते. त्यामुळे, तेथे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी त्यांनीच स्वीकारून राजीनामा द्यावा. अधिकाऱ्यांना निलंबित करून हा प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांची मागणी होती.
यावेळी बोलताना भाजप नेते आणि वकील रमेश देशपांडे म्हणाले की, योग्य नियोजन न करता केवळ श्रेय घेण्यासाठी आय.पी.एल. विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आपली नैतिकता गमावली आहे आणि अजूनही त्यांनी माफी मागितलेली नाही. ‘एकाला ताप आला की दुसऱ्याला चटके’ या म्हणीप्रमाणे अधिकाऱ्यांना निलंबित करून सरकारने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार सत्तेत राहण्यास पात्र नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक हनुमंत कोंगाळी, विजय कोडगानूर, ईरय्या खोत यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta