
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली.
वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते खूप आनंदित झाले. असे जीवन आणि आनंदाने भरलेले वृद्धाश्रम यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचे ब्रिगेडिअर मुखर्जी म्हणाले.
ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना एम.एल.आय.आर.सी.ला भेट देण्याचे निमंत्रण दिले. जवानांना आशीर्वाद देण्यासाठीच नाही, तर केंद्रात आजींसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून ज्येष्ठांची प्रेम आणि आदराने काळजी घेतली जात असल्याबद्दल ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी ॲलन विजय मोरे आणि विनायक पाटील यांनी ब्रिगेडिअर मुखर्जींना अशोकस्तंभ, एक विशेष शांताई स्मृतिचिन्ह आणि एक पुस्तक देऊन सन्मानित केले. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, कर्नल, उद्योगपती दिलीप चिटणीस, सिद्धार्थ हुंदरे, पराग चिटणीस, मारिया मोरे, संतोष ममदापूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta