
बेळगाव : बेळगावातील श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे आज मंगळवारी वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करण्यात येत असून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह आज सकाळी वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार सोहळा देखील पार पडला.
बेळगाव शहरातील सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे सावित्रीच्या मूर्तीचे पूजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले. तत्पूर्वी कपिलेश्वर ट्रस्टच्यावतीने दोन वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. वयोवृद्ध दाम्पत्य गोपाळ कुलकर्णी व सौ. परिमळा गोपाळ कुलकर्णी व चन्नमल्लप्पा फुटाणे व सौ. सुवर्णा चन्नमल्लप्पा फुटाणे यांचा भेट वस्तू देऊन तसेच ओटी भरून सत्कार करण्यात आला. श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये आज सकाळपासून सुहासिनी वडाच्या झाडाचे विधीवत पूजन तसेच सावित्रीच्या मूर्तीचे पूजन करून आशीर्वाद घेताना दिसत होत्या. वटसावित्री पूजेसाठी सुहासिनी महिलांच्या झालेल्या गर्दीसह पूजाअर्चा व अन्य धार्मिक विधीमुळे मंदिराच्या आवारात भक्तिमय वातावरण पसरले होते. सालाबाद प्रमाणे मंदिर ट्रस्टच्यावतीने उपवास केलेल्या महिलांसाठी अल्पोपहार तसेच दुधाचे वाटप करण्यात आले. ज्याचा शेकडो सुहासिनीने लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta