खानापूर : तसा महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवास हा रोमांचकारी असतो. स्वप्नांपेक्षा मोहक आणि कल्पनांपेक्षा सुबक असणारा हा प्रवास वळणदार व आनंददायी व्हावा यासाठी म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे पी यु सी प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींचा स्वागत समारंभ दिनांक 05 जून 2025 रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थीनींच्या शैक्षणिक जीवनातील परिवर्तनशील टप्पा, जिथे ज्ञानाच्या विविध क्षेत्रांचा शोध घेण्याची संधी प्राप्त होते, ते ठिकाण म्हणजे महाविद्यालय असते. माध्यमिक शिक्षणाच्या बंदिस्त, नियंत्रित व दडपणदायी वातावरणातून खुल्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या, स्वातंत्र्याचे पंख फडफडविणाऱ्या विद्यार्थ्यांनींनी भयमुक्त व्हावं आणि आपल्या जबाबदाऱ्या व निर्णय घेण्यास त्या स्वयंस्फूर्तीने शिध्द व्हावं, व्यापक व समृद्ध जीवनानुभवाचा श्रीगणेशा आनंददायी व्हावा त्यांची सामाजिक जाण आणि शैक्षणिक विकास उत्तम व्हावा यासाठी अशा कार्यक्रमांचे नियोजन गरजेचे आहे हे ओळखून स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला कला आणि वाणिज्य शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींच्या शुभहस्ते प्रवेशद्वारावर बांधलेली फीत कापून विद्यार्थ्यांनीनी काॅलेज कॅंम्पसमध्ये प्रवेश केला.
नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी “शेतकऱ्यांच्या लेकी” आहेत हे ओळखून छान झुलं घालून सजवलेली बैलं व रंगीबेरंगी फीत लावून सजवलेल्या बैलगाडीतून वाजतगाजत विद्यार्थ्यांनींना काॅलेजच्या पायरी पर्यंत आणण्यात आले.
याच दरम्यान त्यांच्या वाटेत रांगोळी सडासमर्जन केला होता. तसेच पी यु सी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनींनी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनींच्या मस्तकावर पुष्पवृष्टी केली.
सुरूवातीला व्यासपीठा शेजारी शिक्षण महर्षी नाथाराजीराव हलगेकर व मातृमांगल्य पद्मजादेव हलगेकर यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन उपस्थित पालक, प्रमुख अतिथी व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
आजचा जमाना हा मोबाईल शेल्फीचा आणि फोटो शुटचा आहे, याची जाणीव ठेऊन महाविद्यालय आवारात दोन /तीन शेल्फीचा काॅर्नर बसविण्यात आले होते.
यात “बुलेट व बुलेटवर लावलेला भगवा ध्वज” आणि *I am the Proud Student of MMs Tararani P U College! ” हा पाँईट विद्यार्थ्यांनींचा आवडता बनला होता.
नव्याने प्रवेश घेतलेल्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीना मोतीचूर लाडू देऊन हा आनंद द्विगुणित करण्यात आला. शेवटी काॅलेजच्या सभागृहात महाविद्यालयीन जीवन हे सुवर्ण दिवसांचे पर्व आपण कसं करू शकतो यावर प्रा. आरती नाईक व प्रा. टी. आर. जाधव यांनी आपल्या निवेदनाद्वारे विद्यार्थी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.
व्यासपीठावर मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव पाटील व पर्यावरणवादी स्नेही डाॅक्टर शिवाजी कागणीकर, मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्यात उर्जा निर्माण करतात व गटकार्य, नेतृत्व कौशल्य खुलविणारा हा प्रवास अंगभूत कौशल्यांची क्षितीजे विस्तृत करणारा असतो,तसेच वारंवार आपण आपल्या संस्कृतीचा मागोवा घेत पुढे सरसावले पाहिजे, असे प्रतिपादन काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एन. ए. पाटील, प्रा. मंगल देसाई, प्रा सुनिता कणबरकर, प्रा. पी व्ही कर्लेकर, प्रा. सोनल पाटील, प्रा. नितीन देसाई, प्रा. दिपाली निडगलकर व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.