Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात

Spread the love

 

बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पड‌द्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे, असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. निर्मिती पर्यवेक्षक दीपक सांबरेकर, अमित जाधव आहेत.

आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटातून प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की, त्यांच्या आयुष्यात खळबळ उडते. मात्र न डगमगता हे तीनही मित्र परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील मैत्री जपत फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटामधून दाखविली आहे.

‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील तरुणाईची कथा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधूर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला आहे.

सदरची माहिती देताना निर्माते अमोद मुचंडीकर यांनी तरुणाईची कथा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधुर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला असून या चित्रपटाद्वारे रसिकांना सहकुटुंब हास्याची मेजवानी मिळणार असल्याचे विश्वासाने सांगितले. पत्रकार परिषदेस निर्मात्या वाणी हालप्पणवर यांच्यासह मल्लेश मरुचे, विनायक पट्टणशेट्टी, दीपक सांबरेकर, अमित जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *