
बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री आणि अवैध जुगाराविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी छापे टाकून १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, यात गांजा, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २१,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.
१० जून रोजी बेळगावातील शिवबसवनगर येथे राहणाऱ्या सुमना विक्रांत दिडे (२३) यांच्या घरात गांजा विकला जात असल्याची माहिती सी.ई.एन. गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून तिच्याकडून ८००० रुपये किमतीचा ३३० ग्रॅम गांजा असलेले ५० लहान पाऊच जप्त केले, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. याच दिवशी पोलिसांनी ५ ठिकाणी मटका आणि १ ठिकाणी जुगाराच्या अड्ड्यांवर छापे टाकून ९ जणांना अटक केली. यात ए.पी.एम.सी. मार्केट यार्डजवळ विनायक निंगप्पा नाईक (४६) याला जुगार खेळताना अटक करून त्याच्याकडून २६० रुपये रोख जप्त करण्यात आले.
बाटा रोड, हिंडलगा येथे श्याम भगवानदास गुलबानी आणि मनोज कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंटर भवनसमोर इम्तियाज अब्दुलखादर मिर्झा (५०) आणि जावेद शेख यांना १५०० रुपये रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले, तर के.आय.डी.बी. हॉलजवळ लक्ष्मण यल्लप्पा नाईक आणि परशुराम यांना १४२० रुपये रोख रकमेसह जुगार खेळताना पकडण्यात आले. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंजर गल्ली येथे मोहम्मदशफी मोहम्मदमोदिन तहसीलदार याला ४७५० रुपये रोख रकमेसह अटक करण्यात आली.
या मटका प्रकरणांमध्ये एकूण १३,३०० रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या नवीन रवींद्र पाटील, गौतम जैन, प्रथमेश यादव, दयानंद धामणेकर, आणि दीपक मुदकन्नवर या ५ जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४१५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे पत्ते जप्त करण्यात आले आहेत.
या सर्व कारवायांमध्ये एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि उपायुक्तांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta