कोल्हापूर : लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती, या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे.
कोल्हापूरमधील अनेक लोक मुंबईला कामानिमित्त ये-जा करत असतात. तसेच मुंबईतील अनेक पर्यटक कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संख्या जास्त आहे, मात्र रेल्वेची चांगली कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यानुसार आता या मार्गावर ट्रेन सुरु होणार आहे.
मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसांत या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, “ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल.” हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या मार्गासाठी भाडे काय असेल याची माहितीही समोर येणार आहे.