
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पर्यावरणाचे महत्व आणि मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासंदर्भात चव्हाट गल्लीत जागृती फेरी काढण्यात आली
शाळेच्या आवारात जागृती फेरीचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर “झाडे जगवा” “झाडे लावा” तसेच शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी मराठी भाषिक पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवावे, मराठी भाषेला कमी लेखू नये, मराठी माध्यम भाषेतील शिक्षणाचा कोणताही न्यूनगंड बाळगू नये, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन व घोषणा देत चव्हाट गल्ली आणि सभोवतालच्या परिसरातून पथ संचलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी के मुचंडीकर सर्व शिक्षक वृंद, शाळा सुधारणा समिती आणि माझे विद्यार्थी संघाचे सदस्य जागृती फेरीत सहभागी झाले होते.
मराठी भाषिक पालकांना घरो घरी जाऊन मराठी शाळेची पटसंख्या वाढवण्याचे पत्रक वितरण करण्यात आले. या पत्रकात चव्हाट गल्लीची शाळा नंबर 5 ही बेळगाव शहराचा मानबिंदू आहे, तसेच शाळेला 100 वर्ष होऊन आपल्या शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले जीवन सार्थकी लावले आहे व देशाच्या प्रगतीत हातभार लावला आहे याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या मातृभाषेत आपल्या पाल्यांना शिकण्यासाठी मराठी शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
माजी नगरसेवक पुंडलिक परीट, दीपक किल्लेकर, पंडित पावशे, रवी नाईक, श्रीपत खांडेकर, श्रीकांत कडोलकर जयवंत पाटील मुख्याध्यापक पी के मुचंडीकर, व्ही व्ही पाटील, राजू कांबळे, नाथबुवा, माळी आणि माजी विद्यार्थी संघाचे सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta