
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 24 जून रोजी मराठा मंदिर येथे पार पडली.
सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समितीच्या पुर्नरचनेच्या पार्श्वभूमीवर सदर बैठक बोलाविण्यात आली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते.
या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली व नवनिर्वाचित उच्चाधिकार समितीचे अभिनंदन करण्यात आले. या समितीने सीमाप्रश्नी प्रलंबित खटल्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच महाराष्ट्र सरकारने तज्ञ समितीची देखील पुनर्रचना करावी व तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी नेते जयंतराव पाटील यांची नेमणूक करावी, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. कारण जयंतराव पाटील हे सीमाभागाशी संबंधित आहेत. वेळोवेळी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच भाई एन. डी. पाटील यांच्यानंतर सीमाप्रश्नाची जाण असलेला नेता म्हणून जयंतराव पाटील यांची ओळख आहे. माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले असल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून कामे कशी करून घ्यावी तसेच सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य घेऊन कामे करण्याची जाण आहे.
मागील वर्षभरापासून मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी उच्चाधिकार समिती पुनर्रचना करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. विशेषतः दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनादरम्यान 21 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते त्यानुसार महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली त्यामुळे सीमा प्रश्नाला चालना मिळेल अशी आशा बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मनात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती पुनर्रचना केली त्याचप्रमाणे तज्ञ समितीची देखील पुनर्रचना करून अध्यक्षपदी जयंतराव पाटील यांची नेमणूक करावी या ठरावाची प्रत उच्चाधिकार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना तसेच महाराष्ट्र शासनाला पाठवून देणार असल्याचे देखील यावेळी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सांगितले. 13 जुलैनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे यापूर्वी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन सीमाप्रश्नासंबंधित वकिलांना योग्य त्या सूचना कराव्यात व खटल्याला चालना द्यावी, अशी मागणी बैठकीदरम्यान करण्यात आली तसेच उच्चाधिकार समितीने मध्यवर्ती सदस्यांना या बैठकीला बोलावले तर मध्यवर्तीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील असे देखील कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपले विचार आणि सूचना मांडल्या. या बैठकीला सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, प्रसाद सरडेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे, गोपाळराव देसाई, गोपाळराव पाटील, आबासाहेब दळवी, पांडुरंग सावंत, अजित पाटील, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, लक्ष्मणराव होनगेकर, विकास कलघटगी, डी. बी. पाटील मोनाप्पा संताजी आदी मध्यवर्ती समितीचे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta