
बेळगाव : बेळगावकर निर्माते अमोध मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच दिग्दर्शक योगेश जाधव यांनी बनविलेला वाणीश्री फिल्म प्रॉडक्शनचा धमाल विनोदी चित्रपट “ऑल इज वेल” दि. २७ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
जाती – धर्मा पलीकडच्या मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट बेळगाव शहरातील दोन प्रसिद्ध चित्रपटगृहांमध्ये झळकला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांवर “ऑल इज वेल” चित्रपटाची चर्चा सुरू होती. फुल धमाल आणि मनोरंजनाचा खजाना असलेल्या या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केले आहे.
आनंद, राग, मनातील गुपित व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या “ऑल इज वेल” चित्रपटातून अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव आणि रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. या तिघांसोबत सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बेळगावातील चित्रपटगृहांमध्येही चित्रपट पाहण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची मनोरंजक आणि विनोदी गोष्ट हास्याची मेजवानी ठरत आहे. चित्रपट पाहताना विनोदी शैलीने रसिकांच्या मनावर अभिनयाची छाप निर्माण केलेले दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची आठवण होते.
एकंदरीत तरुणाईची कथा, कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधुर संगीत आणि नेत्र सुखद सादरीकरणाने सजलेला हा चित्रपट नक्कीच बेळगावकरांच्या पसंतीस पडेल, तेव्हा सर्वांनी कुटुंबासह चित्रपट आवर्जून पहावा अशा प्रतिक्रिया चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta