रामनगर : बेळगावातून गोव्याला बेकायदेशीररित्या घेऊन जात असलेले अंदाजे 6 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचे 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक मुख्य आरोपी फरार आहे.
ही कारवाई सोमवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सिद्धप्पा बाळप्पा बद्दूर (वाहनचालक) आणि राजू बाळू नाईक (क्लिनर) – दोघेही बेळगावचे रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल मोहनदास, बेळगाव येथील रहिवासी, याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, अनमोड घाटात रस्ता खचल्यामुळे अवजड वाहतुकीवर बंदी आहे. त्यामुळे रामनगर पोलिसांनी गस्त सुरू ठेवली होती. शिवाजी सर्कल येथे एएसआय राजप्पा दडपणी हे गोव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी केए 25 एबी 6640 क्रमांकाचे टाटा योद्धा वाहन गोव्याच्या दिशेने जाताना आढळले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जामिया मशिदीजवळ वाहन अडवून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत वाहनात गोमांस असल्याची कबुली मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 1930 किलो गोमांस आणि संबंधित वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई केली. अटकेतील दोघांवर कर्नाटक कत्तल प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा 2020 च्या कलम 4 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत, जप्त गोमांस अमोल मोहनदास याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta