

बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला उद्या मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडगाव परिसरात नागरिकांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. मंदिर परिसरात पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. मंगाई यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांची लहान-मोठी दुकाने सज्ज झालेली पहावयास मिळत आहेत. तसेच यात्रेत मनोरंजनाची विविध साधने देखील उपलब्ध असून मोठ मोठाले पाळणे हे या यात्रेचे आकर्षण आहे. यात्रेच्या अनुषंगाने श्री मंगाई देवी मंदिर विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे.

उद्या मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी प्रथेप्रमाणे श्री मंगाई देवी मंदिराच्या पालखीचे ढोल ताशांच्या वाद्यासह मिरवणूक निघेल त्यानंतर मंदिराचे पुजारी सकाळी ठीक अकरा वाजता देवीला घातलेले गाऱ्हाणे उतरवल्यानंतर श्री मंगाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जाईल. त्यानंतर सर्व भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. दरवर्षी बेळगावसह परिसरातील भक्तजन हजारोंच्या संख्येने येत असतात.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर नुकताच बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली व यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने विष्णू गल्ली रोड अशा विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावून चार चाकी वाहनांना मंदिर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यावर्षी मंगाई मंदिर परिसरात प्रशासनाने पेवर्स घालून मंदिर परिसर सुशोभित केला आहे. त्यामुळे भक्तांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी चिखलातून वाट काढत जावे लागणार नाही त्यामुळे मंगाई देवी भक्त तसेच महिला वर्गांमध्ये समाधान पसरले आहे. मात्र नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पशुबंदीच्या फर्मानामुळे मंगाई भक्तांमध्ये थोडीशी नाराजी पसरली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta