
बेळगाव : मराठी भाषेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविकांनी महानगरपालिकेत आवाज उठवला. “आम्हाला प्रशासनाचे उपकार नको, आम्हाला आमचे भाषिक हक्क हवेत” अशी मागणी करत नगरसेवक रवी साळुंखे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला तर सत्ताधारी व विरोधी गटातील काही नगरसेवकांनी मराठीतून परिपत्रके देण्यास विरोध केला व राष्ट्रीय पक्षाच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली. मतदानापूर्ती मराठी प्रेम दाखवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या मराठी नगरसेवकांनी गप्प बसल्यामुळे बेळगावातील मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत समितीच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा परिपत्रके मराठीतून देण्याच्या मागणीवर जोर देत सभात्याग केला. जोपर्यंत आम्हाला मराठीतून परिपत्रके दिली जात नाहीत तोपर्यंत आपण महानगरपालिकेच्या कामकाजात सहभागी होणार नाही असा सज्जड इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी दिला. त्याचप्रमाणे महापौरांच्या वाहनावरील मराठी फलक काढण्याचा निषेध केला यावर सत्ताधारी नगरसेवकांनी महापौरांच्या परवानगीशिवाय बोलण्यावर आक्षेप घेतला. मात्र मराठी नगरसेवकांनी हायकोर्टाच्या आदेशाची प्रत दाखवत आपले म्हणणे महानगरपालिकेत ठामपणे मांडले.
यावेळी बोलताना नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले की, आमचा कन्नड भाषेला विरोध नाही मात्र सीमा प्रश्न अजूनही न्यायालयात प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कानडी भाषेसोबतच मराठी भाषेतून देखील परिपत्रके व सभेचा इतिवृत्तांत देण्यात यावा, अशी मागणी करत मराठी नगरसेवकांनी सभात्याग केला. यादरम्यान सभागृहात गदारोळ झाला त्यामुळे काही काळासाठी महानगरपालिकेचे कामकाज तहतूक करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta