बेळगाव : मोटारसायकलवरून येऊन नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला बेळगाव जिल्ह्यातील नेसरगी पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी लोकांचे पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून पळून जात असत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावातील राजू शिवबसन्नवर यांनी नेसरगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी चाकू दाखवून त्यांच्याकडील २९,०७० रुपये रोख आणि १२,००० रुपयांचा एक टॅब हिसकावून नेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारावर, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरगी पोलीस निरीक्षक गजानन नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. पोलिसांनी इरप्पा महादेव पवाडी, प्रशांत उर्फ परसा रामचंद्र नारी, निंगप्पा उर्फ अजय अडिवेप्पा दोडमनी, रामप्पा उर्फ रमेश बाळप्पा हळबन्नवर आणि सदानंद उर्फ सदाशिव बाळप्पा उद्दान नायक या पाच आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta