बेळगाव : ऐन गणेशोत्सव काळात कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी विरोधी भूमिका मांडत भाषिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले गणेशोत्सव मंडळाचे स्वागत व शुभेच्छा फलक हटवण्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी द्वेष्टेपणा दाखवत शांतता भंग करण्यास सुरुवात केली आहे. काल 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कन्नडसक्ती विरोधात निवेदन देण्यात आल्यानंतर बेळगाव शहरात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समिती आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या शिवराम गौडा गटाच्या मूठभर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिक नगरसेवक रवी साळुंखे यांच्यावर बंदी घालण्याची बालिश मागणी केली आहे आणि मराठीची मागणी करणाऱ्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात जाऊन राहण्याचा गजब सल्ला देखील द्यायला ते विसरले नाहीत. गणेशोत्सवासाठी लावण्यात आलेले फलक काढून टाकण्यात यावेत अशी हास्यास्पद मागणी देखील यावेळी या कन्नड संघटनेने केली आहे. एकंदरीत पाहता कर्नाटक सरकारच्या या कन्नड संघटनांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत सरकारच्या डोक्याचा व्याप वाढवल्याचे दिसून येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta