
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर, श्री. आर. एम. चौगुले, गणपत पाटील, शंकर मारुती पाटील, शंकर लक्ष्मण पाटील तसेच प्रमुख वक्ते म्हणून रोटरी क्लब ऑफ वेणू ग्रामचे श्री. डी. बी. पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्फूर्तीगीत व स्वागतगीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. श्री. गणपत पाटील व शंकर मारुती पाटील यांच्याहस्ते झाले. दीपप्रज्वलन श्री. आर. एम. चौगुले, श्री. शंकर मारुती पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेचे माजी विद्यार्थी श्री. परशराम बसवंत कुडचीकर यांनी शाळेसाठी अँड्रॉइड टीव्ही दिला आहे त्याचे उद्घाटन श्री. आर. एम. चौगुले व डी. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. २०२१-२२ या सालचा धावता आढावा आपल्या अहवालातून श्रीमती एस. एम. पाटील यांनी घेतला. हायस्कूलच्या वतीने बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर व श्री. आर. आर. एम. चौगुले यांचा शाल व श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बौद्धिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम व मागील वर्षीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. याचे सूत्रसंचालन श्रीमती एल. पी. झंगरुचे यांनी केले. मुलांना मार्गदर्शन करतेवेळी बेळगाव ग्रामीण आमदारांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन कशाप्रकारे पुढे जाता येते आर्थिक अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांना हेब्बाळकर फाउंडेशनच्या मार्फत मदत मिळवता येते याची थोडक्यात माहिती दिली. प्रमुख वक्ते श्री. डी. बी. पाटील यांनी परीक्षेचा काळ जवळ आला असल्याकारणाने कशाप्रकारे आपले आरोग्य सांभाळून व्यवस्थितरित्या अभ्यास करता येतो व धैर्याने कशाप्रकारे परीक्षेला सामोरे जाता येते याबद्दल सांगितले. श्री. आर. एम. चौगुले यांनी कशाप्रकारे जिद्दीने व मेहनतीने यश काढता येते हे सांगितले व दहावी परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. श्री. गणपत पाटील यांनी कशाप्रकारे चित्रपट सृष्टीत प्रवेश करता येतो. किती मेहनत घ्यावी लागते याबद्दल सांगितले. आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार बळवंत देसुरकर तर विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थिनी कुमारी पूर्वा मंडलिक हिची निवड करण्यात आली व त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी निरोपपर भाषणे केली तसेच इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका श्रीमती आर. ए. परब यांनी मार्गदर्शनपर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामलिंग पाटील तर आभार श्रीमती आर. ए. पाटील यांनी मांडले. यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी वर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta