‘सकाळ’तर्फे आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि ‘ओम नमस्ते गणपतये…त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि…त्वमेव केवलं कर्तासि…’, असा सामुदायिक सूर अथर्वशीर्ष पठणामुळे आसमंतात घुमला. मंत्रमुग्ध वातावरणातील या चैतन्यमयी सोहळ्यात बेळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘सकाळ’ आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. ३०) दुपारी मारुती गल्लीतील मारुती मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी सहभागींना ‘सकाळ आरती संग्रह’ व ‘अथर्वशीर्ष’ची प्रत व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाला साजेशा वातावरणात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण घेण्यात आले. प्रारंभी मारुती मंदिरात पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अकरा वेळा सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, भाजप नेते विनय कदम, व्ही. पॉवर इंडियाचे संचालक वैभव कदम, कलाश्री भजनी मंडळाच्या नम्रता कुलकर्णी व ग्रुप आणि मारुती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय होनगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य बातमीदार मल्लिकार्जुन मुगळी यांची उपस्थिती होती.
विनय कदम यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘‘सकाळ’तर्फे पुण्यामध्ये अथर्वशीर्ष पठणाचे मोठे कार्यक्रम होत असतात. यावेळी बेळगावात असा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित केला, ज्यामुळे बेळगावकरांत एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. ‘सकाळ’ने असे वेगवेगळे उपक्रम कायम घ्यावेत.’’ होनगेकर यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
विनायक ओगले यांनी अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘‘अथर्वशीर्ष पठण हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. या पठणामुळे सकारात्मकता निर्माण होते. पुढील वेळी तुमच्या कुटुंबीयांना देखील या उपक्रमात सहभागी करून घ्या.’’ यावेळी समर्थ सोसायटीचे उपाध्यक्ष अभय जोशी, संचालक अरविंद कुलकर्णी, राघवेंद्र केसनूर, गणेश दड्डीकर, पी. जी. घाडी आदींची उपस्थिती होती.









Belgaum Varta Belgaum Varta