बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांच्या प्रश्नाला दिलेले अवमानकारक उत्तर निषेधार्ह असून त्यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा राज्य चिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, “उत्तर कन्नड जिल्ह्यात सुबक प्रसूती रुग्णालय केव्हा उभारले जाणार?” असा महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांनी विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्य महिलांच्या आरोग्यासंदर्भातील महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र, देशपांडे यांनी “तुझी प्रसूती झाल्यावर उभारतो” अशा अत्यंत अशोभनीय आणि नीच पातळीवरील शब्दांत उत्तर देत महिलांचा अपमान केला आहे.
ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित असलेले सौजन्य व प्रगल्भता बाजूला ठेवून दिलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस संस्कृतीचे खरे स्वरूप उघडकीस आले आहे. अशा वक्तव्यांमुळे तरुण पिढीला चुकीचा संदेश जातो. विकासाविषयी प्रश्न विचारला असता वैयक्तिक पातळीवर घसरलेली प्रतिक्रिया देणे ही काँग्रेसची दुर्दैवी वृत्ती असल्याचे डॉ. सोनाली यांनी स्पष्ट केले.
डॉ. सोनाली सरनोबत पुढे म्हणाल्या की, “विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता वैयक्तिक टीका करणे ही काँग्रेसची दुर्दैवी वृत्ती आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी देशपांडे यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी” देशपांडे यांनी तातडीने पत्रकार राधा हिरेगौडर यांची तसेच संपूर्ण महिला समाजाची माफी मागावी. अन्यथा महिला मोर्चा याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल.
Belgaum Varta Belgaum Varta