
बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ढोलताशांच्या पारंपारिक वाद्यांचा वापर यामुळे सर्वत्र मराठमोळे वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाच्या उधळणीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. लाखो भाविकांना उत्साह देणारी यंदाची गणेश मिरवणूक तब्बल 38 तास चालली. गणेश चतुर्थी पासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची जल्लोषात सांगता झाली.
11 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ तसेच प्रशासनाने मिरवणूक भव्य प्रमाणात करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. हुतात्मा चौक येथे जिल्हा प्रशासन तसेच मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे गणेश मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महामंडळ कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, विकास कलघटगी, विजय जाधव, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हुतात्मा चौकातून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला होता. ग्रहणकाळ असून देखील विसर्जन मिरवणूक तब्बल 38 तास चालली. मिरवणुकीच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत युवक, युवतींच्या उत्साहाला उधान आले होते. गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. शहापूर कपिलेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव (जक्कीन होंड), अनगोळ तलाव, किल्ला तलाव आधी ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अनंत चतुर्दशी ऐवजी दुसऱ्या दिवशी मूर्ती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर काढला. आकर्षक सजावट करीत गणेश मूर्त्या विसर्जन तलावाकडे ढोलताशांच्या गजरात नेण्यात आल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील अनेकांनी गणेश मूर्तींचे दर्शन घेतले. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील चौकाचौकांमध्ये युवक, युवतींसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गणेश विसर्जन मिरवणूक रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, पाटील गल्ली शनी मंदिर मार्गे फटाक्यांची आतिषबाजी करत गणराया कपिलेश्वर विसर्जन तलावाकडे मार्गस्थ झाले. तब्बल साडेतीनशेहून अधिक गणेश मूर्तींचा सहभाग हजारो गणेश भक्त, कलापथकांचे सादरीकरण यामुळे संपूर्ण मिरवणूक लक्षवेधी ठरली. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी बारा फुटापेक्षा अधिक मोठ्या गणेश मूर्ती साकारल्या होत्या. या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाने क्रेनची व्यवस्था केली होती. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशासनाने आवाहन करून देखील बऱ्याच गणेशोत्सव मंडळानी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीला फाटा देत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर करत गणेश विसर्जन केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. तरुणांनी हुल्लडबाजी करू नये म्हणून पोलीस त्यांना वेळोवेळी समज देत होते. विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सव मंडळांची संख्या नगण्य होती. त्यानंतर महामंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पोलिसांनी गल्लोगल्लीत जाऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्याचे आवाहन केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक गणेश मूर्ती विसर्जनासाठी येऊ लागल्या. यावर्षी बहुतांश गणेश मूर्ती मोठ्या असल्यामुळे विसर्जनासाठी विलंब लागत होता. त्यामुळे बऱ्याच गणेशोत्सव मंडळांना रविवारी सायंकाळपर्यंत विसर्जनासाठी वाट पाहावी लागली. क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडथळा येऊ नये यासाठी महामंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी प्रयत्नशील होते. शहराच्या विविध भागात विसर्जन तलाव असून देखील बऱ्याच मंडळांनी कपिलेश्वर तलावावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे कपिलेश्वर तलावावर रविवारी रात्रीपर्यंत विसर्जन सुरूच होते. विसर्जनाला विलंब लागल्यामुळे पोलीस प्रशासन, महानगरपालिका व हेस्कॉम कर्मचाऱ्यांना देखील ताटकळत रहावे लागले. विसर्जन तलावाच्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटचा गणेश विसर्जन होईपर्यंत पोलिस आयुक्त भूषण बोरसे स्वतः जातीने हजर होते. त्यांच्या या कृतीचे बेळगावकरांकडून कौतुक होत आहे. यावर्षी माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेश मूर्तीला पहिला विसर्जनाचा मान मिळाला. तर महानगरपालिकेच्या गणेश विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta