होय, मी गणपती बोलतोय!!
मी निघालो, येतो परत!!!
ज्या भक्तीभावाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले ते पाहून मन भारावून गेले. दहा दिवस आनंदाने, जल्लोषात, धार्मिक वातावरणात माझी पूजाअर्चा केली गेली. त्यामुळे खरंच मी तृप्त झालो. परंतु ज्या आनंदी व धार्मिक वातावरणात माझे आगमन झाले तसाच निरोप देखील द्यावा अशी अपेक्षा होती. मात्र माझी खूप मोठी निराशा झाली ही खंत पुढच्या वर्षी पर्यंत राहील होय “मी बाप्पा बोलतोय”.
माझा उत्सव आनंदासाठी असावा. सर्वधर्मसमभाव सलोखा, संस्कृती जपून राहावी म्हणून दरवर्षी उत्साहाने विराजमान होणारा माझा उत्सव आता पुन्हा उन्माद आणि असामाजिकतेकडे वळत चालला आहे म्हणूनच चिंता!
कृपया भक्तांनी, मंडळांनी याची दखल घ्यावी असेच काहीसे बाप्पाचे म्हणणे आहे. त्यामुळे तब्बल 39 तासांपेक्षा अधिक काळ लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीचे आता तरी विचार मंथन व्हावे असेच मत सामान्य बेळगावकरांचे आहे.
बेळगावच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. मुंबई, पुणे या शहरांपेक्षा भव्य दिव्य असा बेळगावचा गणेशोत्सव मानला जातो. आगमन सोहळे तर गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग बनला आहे. गणेशोत्सवापूर्वी बेळगाव शहरात आगमन सोहळा मोठ्या प्रमाणात होत असतो. शिवाय दरवर्षी विसर्जन मिरवणूक देखील दणक्यात होते. डॉल्बी व फटाक्यांच्या आतिषबाजीत होणारी गणेश विसर्जन मिरवणूक देखील 24 तासाहून अधिक काळ लांबल्या असून यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल 39 तासांपर्यंत लांबली. परिणामी गणरायाचे विधीपूर्वक वेळेत विसर्जन होणे कठीण बनत चालले आहे.
ग्रहण काळात विसर्जन?
रविवारी चंद्रग्रहण होते. ग्रहणाचे वेध दुपारी 12.37 पासून सुरू होणार होते. सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत अर्थात पहाटे 1 वाजून 27 मिनिटांपर्यंत वेद पाळणे अपेक्षित होते. ग्रहणाच्या काळात धार्मिक कार्य तसेच शुभकार्य वर्ज्य मानले जाते. असे असताना हिंदू परंपरा, धार्मिक रितीरिवाजांचे उल्लंघन करत विघ्नहर्ता बाप्पाचे विसर्जन ग्रहण काळातही सुरू होते. परिणामी आपणच आपल्या धार्मिक नियमांचे उल्लंघन करून जणू बाप्पाला वेठीस धरत आहोत का? याचा विचार होणे गरजेचे आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष
बेळगावची विसर्जन मिरवणूक शिस्तीत, शांततेत व वेळेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन काही नियम घालून देते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात भक्तीभावाने बाप्पाला निरोप द्यावा म्हणून नियम असतात. परंतु डीजेच्या दणदणाटात सर्व नियम धाब्यावर बसवत थिरकणारी तरुणाई विसर्जन मिरवणुकीत साऱ्या नियमांची पायमल्ली करताना दिसते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत अवघ्या बोटावर मोजणाऱ्या गणेश मूर्ती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे विसर्जनाचा कालावधी वाढलाच शिवाय प्रशासनाने दिलेले नियम देखील मंडळांनी दुर्लक्षित केले. गणरायाचे विधिवत पूजन करून स्थापना ज्या पद्धतीने वेळेत होते तसेच विसर्जन देखील वेळेतच व्हावे. मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून प्रशासन तसेच गणेशोत्सव महामंडळ कार्यरत असते. महामंडळाच्या बैठकीत तसेच जागृतीच्या माध्यमातून सूचना करण्यात येतात. मात्र सालाबादप्रमाणे मंडळांची मनमानी आणि प्रशासनाचे अपयश हे एक चक्र सुरूच असते. सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव नसून जणू स्पर्धाच बनली आहे. लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्रित यावा या उद्देशाने गणेशोत्सवाचा पाया घातला. अर्थात यामुळे समाज एकत्रित येऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा केला जाऊ लागला. मात्र दिवसेंदिवस त्याचे स्वरूप बदलत गेले व उत्सवाला भलतेच स्वरूप प्राप्त झाले आणि प्रत्येक गल्लीचे विभक्त मंडळ स्थापन करत त्याची विभागणी झाली. त्यामुळे तरुणाई अर्थात मंडळाकडून उत्साह आनंदाचा, एकतेचा सोहळा न राहता चुरस आणि स्पर्धेचा सोहळा बनला आहे. मूर्ती, मंडपासाठी सजावट, आगमन सोहळा, विसर्जन मिरवणूक यामध्ये माझे मंडळ पुढे की तुमचे मंडळ पुढे याची चुरस वाढत गेली आहे. परिणामी विधायक स्वरूप बाजूला राहून स्पर्धा वाढू लागली आहे ही स्पर्धा उत्सवाला गालबोट लावणारी ठरू नये याची काळजी घेणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. निदान पुढील वर्षी तरी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा. तब्बल 39 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर सर्वांनी अर्थात प्रशासन, सामान्य नागरिक, महामंडळ यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि या प्रकारची परिस्थिती पुढल्या वर्षी उद्भवू नये याची काळजी आतापासूनच घ्यावी लागेल.
भल्या मोठ्या मूर्ती स्थापनेनंतर असणारा बाप्पाचा थाट विसर्जनानंतर पायदळी तुडवत त्या मूर्तीची होणारी अहवेलना थांबवायची असेल तर मूर्तींच्या उंचीवर मर्यादा असावी. विसर्जन तलावाची क्षमता आणि मूर्तींची उंची यांचा ताळेबंद घालत मंडळाने आदर्श जोपासावा. पर्यावरणाला हानी पोचवत साजरा केलेला उत्सव धोकादायक ठरू शकतो यासाठी मंडळांनी विचार मंथन करून शाळा, महाविद्यालय, वृद्ध, बालके यांच्यासाठी स्पर्धा आर्थिक मदत अश्या प्रकारचे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा.
Belgaum Varta Belgaum Varta