बेळगाव : मुंबई येथील मंत्रालयामध्ये सीमा कक्षाच्या सभागृहात तज्ञ समितीची विशेष बैठक 10 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीप्रसंगी सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी लोकसभा व राज्यसभेत सीमा प्रश्नाबद्दल आवाज उठवावा या संदर्भात खासदार धैर्यशील माने व खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात १९५६ साली भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळी मुंबई प्रदेशांमध्ये बेळगावसह ८६५ मराठी भाषिक गावे अन्यायाने कर्नाटकात डांबली गेल्याचे नमूद केले आहे तसेच सीमा भागातील मराठी माणूस गेली सत्तर वर्षे आपल्या न्याय व हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे त्यासाठी वेळोवेळी मोर्चे, धरणे, उपोषण करत लढत आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायती पासून विधानसभेपर्यंत सर्व निवडणुका केवळ सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर लढवून त्या प्रचंड मताधिक्याने जिंकून येथील मराठी माणसाने हा भाग महाराष्ट्राचा असल्याचे वेळोवेळी सिद्ध केल्याचे देखील या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हैसूर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांनी म्हैसूर राज्यातील मराठी बहुल गावे महाराष्ट्राला दिली गेली पाहिजेत असे स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात कर्नाटक विधानसभेमध्ये प्रोसिडिंग देखील झाले आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार व राज्यसभा सदस्यांनी एकत्रितपणे लोकसभेमध्ये सीमा प्रश्नावर चर्चा घडवून या प्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर करावी. त्याचप्रमाणे सीमा प्रश्नाच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी जेष्ठ वकिलांची नेमणूक करून सीमाप्रश्न प्रलंबित असलेल्या दव्याला गती देण्यात यावी अशी विनंती बेळगाव तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta