बेळगाव : बेळगावमध्ये सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत असताना जाणीवपूर्वक सीमाभागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. नुकताच झालेल्या गणेशोत्सव व ईद-मिलादच्या काळात शुभेच्छा फलकांवर मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत करवेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन धुडगूस घातली असून त्यांच्या या कृत्याने बेळगाव शहरातील शांतता भंग झाली असून सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत थेट आयुक्तांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे महानगरपालिकेत एकाच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांमध्ये व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. या दरम्यान कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी नामफलकांवरून मराठी, उर्दू तसेच इंग्रजी भाषेचा वापर पूर्णपणे थांबवून केवळ कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांना दिले. महानगरपालिकेत घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करत बेळगाव मराठी भाषिकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत असताना कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांमुळे शहरात तणाव निर्माण होत असून देखील प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे मराठी संघटना व कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या जिल्हा प्रशासनात अनेक दिग्गज अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने प्रशासन हाताळले जावे. मराठी भाषिकाबाबत प्रशासनाकडून होणारा दुटप्पीपणा बंद व्हावा अशी मागणी बेळगाव शहरातील जनता तसेच मराठी भाषिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta