बेळगाव : राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मोबाईल ॲप देखील सरकारने उपलब्ध केले आहे. परंतु सदर मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे सर्वेक्षणाच्या कामात अडथळा येत आहे. या सर्वेक्षणामध्ये एकंदर 60 प्रश्नांची माहिती संकलित करावी लागत आहे त्यामुळे ही माहिती भरून घेण्यासाठी प्रत्येक घरात किमान एक तास वेळ जात आहे. सर्वर डाऊनची समस्या निर्माण झाल्यास सर्वेक्षणाचे काम खोळंबून राहत आहे त्यामुळे दिवसभरात अगदी मोजक्याच घरांचा सर्वेक्षण होत असल्यामुळे शिक्षक वर्गातून नाराजी पसरली आहे. त्याचप्रमाणे सर्वेक्षण करण्यासाठी हेस्कॉमकडून प्रत्येक घरावर स्टिकर चिकटवण्यात आले आहेत त्यावरील नंबर घातल्यानंतरच सर्वेक्षणाचे ॲप सुरू होते परंतु एकच क्रमांक अनेक घरांवर लावला असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीतच सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले आहेत परंतु मोबाईल ॲप मधील त्रुटीमुळे सर्वेक्षणाला वेळ लागत आहे त्यामुळे सर्वेक्षणाचे काम सरकारने दिलेल्या वेळेत पूर्ण होणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत. मराठा समाजाने राज्यातील जनतेला जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणामध्ये धर्म -हिंदू, जात -मराठा, पोटजात -कुणबी, मातृभाषा -मराठी अशी नोंद करण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेल्या शिक्षकांकडून योग्य माहिती भरून घेतली जावी यासाठी अनेक कुटुंबांचे प्रयत्न असल्याने हे सर्वेक्षण योग्यरीतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत सरकारने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta