बेळगाव : जिल्ह्यात जातीय जनगणना सर्वेक्षण सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण संथगतीने चालू आहे. सरकारकडून निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी विहित अर्ज देण्यात आले असून तुमच्या कुटुंबाची माहिती तुम्हीच भरून द्या अशी सूचना अर्ज देणाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सदर अर्ज कन्नड व इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी भाषेची अडचण निर्माण झाली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे परंतु बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी सर्वेक्षणासाठी फिरत आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे व सरकारने दिलेल्या ॲप मध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे सर्वेक्षण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बऱ्याच ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागामध्ये कुटुंबाची माहिती व्यवस्थितरित्या देण्यात आलेली नाही. घरातील कर्ता पुरुष बाहेर गेला असल्यास कौटुंबिक माहिती देताना महिलांचा गोंधळ उडत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित अधिकारी घरी गेले असता मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका, अन्य दाखले शोधण्यात कुटुंबीयांचा वेळ जात आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांशी डोकेदुखी वाढली आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण बारा लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. सोमवारी दिनांक 22 पासून सर्वेक्षणास सुरुवात झाली असून 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत परंतु देणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत केवळ सात ते आठ टक्के कुटुंबांची गणती झाल्याचे दिसून येत आहे. येत्या आठ ते नऊ दिवसात उर्वरित सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta