

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन
बेळगाव : काकती ग्रामपंचायतीतील सदस्यांनी असंविधानिक पद्धतीने वाढवलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली असून, करवाढ मागे घेतली नाही तर सर्व सदस्य सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.
काकती हे गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे येथील मालमत्तांवर अतिरिक्त कर आकारण्यात आला आहे. या वाढीमुळे शेतकरी आणि अल्पभूधारकांवर आर्थिक भार पडल्याची तक्रार सदस्यांनी केली. करवाढ तत्काळ रद्द न केल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा सदस्य गजानन गव्हाणे यांनी दिला.
गावातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तरीदेखील सुमारे पाच टक्क्यांनी वाढवलेल्या करामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. करवाढ ही नियमानुसार आणि शास्त्रोक्त पद्धतीने करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा अन्य एका सदस्याने दिला.
यावेळी लक्ष्मण पाटील, बी. टी. टुमरी, बी. जे. हिरेमठ, मारुती कंग्राळकर, मल्लाप्पा गोमनाचे, सिद्धप्पा टुमरी, जी. एस. शिवापूजीमठ, महेश रंगाई आदी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta