
बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार नेहमीच दडपशाही करत असते. बेळगावातील मराठी भाषिक संविधानाच्या माध्यमातून आपला लढा देत असतात परंतु कर्नाटक प्रशासन वेगवेगळ्या तऱ्हेने सीमा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असते. येत्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पुन्हा एकदा कर्नाटक प्रशासनाने दडपशाही करण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव पोलीस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना खबरदारीची नोटीस बजावत एक प्रकारे मराठी भाषिकांना धमकावण्याचे काम केले आहे. पोलीस प्रशासनाच्या या कृतीमुळे मराठी भाषिकात संताप व्यक्त होत आहे.
मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी दाखल केलेल्या अहवालावरून मध्यवर्ती महाराष्ट्र वर्गीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना खबरदारीची नोटीस बजावली आहे. या अहवालानुसार या नोटीसित नमूद करण्यात आले आहे की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते 1 नोव्हेंबर रोजी धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरी काढून काळा दिन पाळण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी देखील 2023- 24 सालामध्ये अशाच प्रकारे फेरी काढल्याचा उल्लेख देखील पोलिसांनी या नोटिशीत केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम कलम 126 नुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयाची वैयक्तिक हमी आणि दोन जामीनदारांची हमी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे ऍड. एम. जी. पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन एक नोव्हेंबर रोजी काळा दिन शांततेत पाळण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर तात्काळ पोलीस प्रशासनाने समितीने त्यांना खबरदारीची नोटीस बजावल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कृतीमुळे राज्योत्सव आणि काळा दिनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बेळगावत मराठी – कन्नड असा भाषिक वाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांनी पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta