

बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेते मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांना खबरदारीसंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटिसीला महाराष्ट्र एकीकरण समिती कायदेशीररित्या उत्तर देणार असून कितीही दडपशाही झाली तरी 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी सायकल फेरी निघणारच असा वज्र निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. पोलीस प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व मालोजी अष्टेकर यांनी पोलीस उपायुक्तांच्या वीरभद्र नगर येथील कार्यालयात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पाच लाखाचे वैयक्तिक हमीपत्र आणि पाच लाखाचा जामीन प्रत्येकी सादर केला आहे. प्रशासनाने बजावलेल्या या नोटिशीत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. या नोटीसीत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. कायदा प्रक्रियेचे उल्लंघन करून प्रशासनाने मराठीद्वेष्टेपणा दाखवत सदर नोटीस बजावली आहे त्यामुळे त्या नोटिसीला महाराष्ट्र एकीकरण समिती कायदेशीर आव्हान देणार आहे.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, एक नोव्हेंबर काळ्यादिनी सायकल फेरी ही काढली जाणारच कितीही दबाव आणला तरी मराठी मन दडपता येणार नाही पोलिसांच्या नोटिसीने मराठी जनतेचा आवाज थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीत परिणामांची तमा न बाळगता सायकल फेरी निघणारच असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे मराठी माणसात संतापाची लाट उसळली असून कर्नाटक सरकारचा मराठी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्यसभा दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पुन्हा एकदा कन्नड मराठी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta