
बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बाबूराव पाटील यांनी जुलै २०२४ मध्ये उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या वर्तनामुळे ग्रामपंचायतीची विकासकामे ठप्प झाली असून, सदस्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्येही मतभेद आणि असंतोष वाढला आहे. सदस्यांनी यापूर्वीही अनेकवेळा उपाध्यक्षांना विकासकामे व निर्णय प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले होते. तथापि, कोणताही बदल न झाल्याने अखेर सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
निवेदन प्रांताधिकारी आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, पुढील काही दिवसांत कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित होणार आहे. ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींमुळे आता येथील स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत या अविश्वास ठरावावर कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य महादेवी मेदार, मधू नलवडे, निशा चांदीलकर, विठ्ठल पाटील, रेणुका सुतार, रेश्मा कुलम, रूपा सुतार, धाकलू पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta