
बेळगाव : मागील आठवड्यात प्रलंबित राहिलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चार जागांची निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बैलहोंगल, कित्तूर, निप्पाणी आणि हुक्केरी या सहकारी क्षेत्रांतून अनुक्रमे महांतेश दोड्डगौडर, नानासाहेब पाटील, अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांनी विजय मिळवला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिली.
रविवारी बेळगाव डीसीसी बँकेच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले, “न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल जाहीर करण्यात काहीसा विलंब झाला. बैलहोंगल क्षेत्रातून महांतेश दोड्डगौडर यांनी ५४ मते मिळवत व्ही. आय. पाटील (२१ मते) यांचा पराभव केला. कित्तूर क्षेत्रातून नानासाहेब पाटील यांनी १७ मते मिळवत विक्रम इनामदार (१५ मते) यांच्यावर मात केली. निप्पाणी क्षेत्रातून अण्णासाहेब जोल्ले यांनी ७१ मते मिळवून उत्तम पाटील (४८ मते) यांचा पराभव केला, तर हुक्केरी क्षेत्रातून रमेश कत्ती यांनी ५९ मते मिळवत राजेंद्र पाटील (३२ मते) यांच्यावर विजय मिळवला,” अशी माहिती त्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta