Tuesday , March 3 2026
Breaking News

काव्यगंधात रंगले रसिक श्रोतेगण : चारोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धा, “काव्यगंध” हा कवितांचा कार्यक्रम आणि काव्यसंग्रह प्रकाशन अशा विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी दामले यांच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक आलगोंडी होते. शब्दगंधचे सचिव सुधाकर गावडे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या साहित्यप्रेमी वाटचालीचा आढावा घेतला. उद्घाटनपर भाषणात दीपक किल्लेकर यांनी शब्दगंधच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.

यानंतर झालेल्या उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘धागेदोरे’ या विषयावर तब्बल २५ हून अधिक कवींनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत प्रा. रामदास बिर्जे (कोवाड) यांनी प्रथम, कु. हर्ष अजय पावशे (मराठी विद्यानिकेतन) यांनी द्वितीय, तर कु. सोनल शेखर शहापूरकर (महिला विद्यालय) हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सुंठणकर आणि कवी शिवाजी शिंदे यांनी काम पाहिले.

यानंतर ‘काव्यगंध’ हा बहारदार कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. रेखा गद्रे यांनी शब्दगंध, फिकीर, हुंडाबळी या कविता वैशिष्ट्पूर्ण सादरीकरणाने रसिकांची भरभरून दाद मिळवली.
कवी बसवंत शहापूरकर यांनी ‘बाईच्याच जीवावर’, ‘मातीचं गुपित’, ‘देवा तुझे आभार’ या कविता गाऊन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कवयित्री उर्मिला शहा यांनी ‘मी एक्सपायरी डेटेड’, ‘पाऊस’, ‘ती’ या कवितांमधून समाजातील वास्तवाची जाणीव प्रकट केली.
कवी परशराम खेमणे यांनी ‘जमले नाही’, ‘भाकरी’, ‘पाऊस’ या कवितांमधून जीवनातील सूक्ष्म भाव व्यक्त केले.
कवी गुरुनाथ किरमटे यांनी खुमासदार निवेदन करत ‘एक दोन श्वास’, ‘बाप’, ‘दिवाळी’ या कवितांनी रसिकांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमादरम्यान दिवंगत कवयित्री सूर्यप्रभा मधुकर सावंत यांच्या ‘अमृतधारा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते झाले. तसेच गोव्याचे कवी दामोदर मळीक, कवयित्री स्नेहल बर्डे आणि कवयित्री रोशनी हुंदरे यांचा या वर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाबद्दल सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वाय. पी. नाईक, निळूभाऊ नार्वेकर, जयवंत जाधव, अश्विनी ओगले, व्ही. एस. वाळवेकर, मधुकर सावंत, मोनिका डांगरे, पुंडलिक पाटील, प्रेमा मेणशी, मधू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्मिता किल्लेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *