
बेळगाव : मूळचे लोंढा येथील आणि सध्या बेळगावच्या टिळकवाडी परिसरात वास्तव्यास असलेले जेष्ठ पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर (वय ६७) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.
पत्रकारितेची खास शैली आणि मार्गदर्शक
नीटनेटकेपणा आणि रुबाब हे त्यांचे विशेष गुण उठून दिसायचे. ‘प्रकाशझोत’ ही त्यांची मालिका त्यांच्या शोध पत्रकारितेच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडवून जायची. खानापूर तालुका आणि बेळगाव जिल्ह्याचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता, ज्यामुळे त्यांच्या बातम्या सखोल असत. त्यांनी अनेक पत्रकार घडवले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
दीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्द
परुळेकर यांनी ‘तरुण भारत’ मधून आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही काळ ‘इन बेळगाव’चे संपादक म्हणून काम पाहिले. पुन्हा ‘तरुण भारत’चे मुख्य प्रतिनिधी आणि आवृत्ती प्रमुख, ‘पुण्यनगरी’चे आवृत्ती प्रमुख आणि ‘पुढारी’ वृत्तपत्राचे निवासी संपादक असा मोठा आणि महत्त्वाचा प्रवास त्यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta