
शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या मागणीला प्रतिसाद
सततच्या आणि अतिरिक्त पावसामुळे लालवाडी ते चापगाव आणि चापगाव ते आवरोळी या मार्गांवरील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वाहतुकीला अडचण होत होती. या रस्त्यानेच उसाच्या ट्रकांची वाहतूक होत असते त्यालाही अडथळा निर्माण झाला होता. याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केलेले होते. अशा या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन पुढे सरसावली. शिवस्वराज संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करत रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, असा आग्रह मागील आठवड्यात धरला होता.
फाउंडेशनच्या इशारा वजा मागणी आणि पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्यांवरील दुरुस्तीची कामे सुरू केली असून कार्यवाहीला गती दिली आहे. यासंबंधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधून रस्ता बांधकामाचे तथा खडीकरणाचे काम एक दोन महिन्यात हाती घेऊन शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण केले जाईल, अशी खात्री दिली आहे. शिवस्वराज फाउंडेशनचे उपाध्यक्ष माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. रमेश धबाले, चापगाव, खजिनदार उद्योजक श्री. मुकुंदराव पाटील, शिवोली, श्री. रामा कोकणकर श्री. गजानन पाटील इत्यादींनी दुरुस्ती कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
तूर्तास रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवस्वराज फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta