
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने गल्लीतील श्री वेताळ देवस्थान व श्री बसवाना देवस्थान येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीस अदिती पवार, प्रीती पाटील, मेघना पाटील यांनी मंदिरांसमोर सुंदर रांगोळी रेखाटली. कुमारी ज्योती सुतार हिने दीपोत्सवाबद्दलची माहिती सांगितली. दिव्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. यावेळी उपस्थित पंचमंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

सौ. नीलम बडवानाचे व सौ. वंदना देसाई यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्त्री-पुरुषांनी यावेळी आरत्या म्हटल्या. उपस्थित स्त्रियांनी दिव्यांची आरास करून परिसर उजळून टाकला. दिवाळीच्या सणावेळी घरासमोर घालण्यात येणाऱ्या रांगोळ्यांचे परीक्षण करून काही महिलांना उत्कृष्ट रांगोळीबद्दल पंचमंडळींच्या तर्फे बक्षिसे देण्यात आली. अध्यक्ष चंद्रप्रभा सांबरेकर, अंजनाताई शंभूचे व पंचमंडळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले. अदिती पवार हिने आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुतार हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता शंभूचे, वनिता मुतकेकर, रेणुका कोकितकर, लक्ष्मी उसूलकर, सुनिता शंभूचे, विजया संभाजीचे यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta